जीएमसीसी कंपनीकडून १५२ कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची ग्वाही :- भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सरपंच मनोज मुंगसे यांच्या प्रयत्नांना यश
पारनेर :- सुपा एमआयडीसीमधील जीएमसीसी कंपनीने आपल्या १५२ कर्मचाऱ्यांना येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी २०२६ पासून कायमसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सरपंच मनोज मुंगसे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांनी या युवकांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा केला. कर्मचाऱ्यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर मनोज मुंगसे यांनी कंपनी प्रशासनाशी चर्चा करून त्यांच्या स्थायीकतेचा विषय मार्गी लावला.
जीएमसीसी कंपनीतील डिझाइन इंजिनीयर, ट्रेनिंग इंजिनीयर अशा विविध पदांवरील १५२ युवकांना हे नियुक्तीपत्र मिळणार आहे. या युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांचं कामकाज समाधानकारक असल्याने कंपनीने त्यांना कायम करायचं ठरवलं आहे.
यापूर्वी काम संपल्यानंतर या युवकांना बाहेर जाण्याची भीती वाटत होती. मात्र, कंपनीने ही भीती दूर करत स्पष्ट केलं की, कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार नाही.
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, बहुतेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण चीनमध्ये झाले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव आणि कौशल्य कंपनीसाठी अत्यंत मोलाचे आहे. यामुळे काही कर्मचाऱ्यांना सुपरवायजर पदावरही बढती देण्यात आली आहे.
मनोज मुंगसे यांनी या निर्णयाचं स्वागत करताना सांगितलं, “कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आणि भवितव्याला न्याय मिळाला. आम्ही यापुढेही युवकांच्या हक्कासाठी लढत राहू.”
या निर्णयामुळे १५२ युवकांना मोठा दिलासा मिळाला असून, सुपा एमआयडीसीमध्ये सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. कंपनीने घेतलेल्या या सकारात्मक पावलामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे