आमदार काशिनाथ दाते सर यांचा नियम 293 अंतर्गत प्रस्ताव…
पारनेर-नगर मतदारसंघात महापुराने झालेल्या नुकसानीकडे शासनाचे वेधले लक्ष…
पारनेर :- पारनेर-नगर मतदारसंघात अलीकडेच झालेल्या अचानक अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले असून, यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनात नियम 293 अंतर्गत प्रस्ताव मांडत शासनाचे लक्ष वेधले आहे.
या महापुरामुळे अनेक गावांमध्ये नागरिक अडकले होते. प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, मात्र रस्त्यांचे, शेतीचे, पिकांचे, जनावरांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानीच्या भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. सर्व संबंधित विभागांनी पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर केले आहेत. तसेच पुढील काळात कोणत्या उपाययोजना आवश्यक असतील याचीही माहिती शासनाकडे पाठवण्यात आली आहे.
आ. काशिनाथ दाते सर म्हणाले की,
“शहरांमध्ये जेव्हा काही संकट येते, तेव्हा शासन तत्काळ उपाययोजना करते. मात्र ग्रामीण भागातील समस्या आणि नुकसान याकडे वेळेवर लक्ष दिले जात नाही. हा दुजाभाव न करता समतोल विकासासाठी ग्रामीण भागाचे स्वतंत्र धोरण तयार करण्याची गरज असून ग्रामीण भागातील नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.”
या प्रस्तावाद्वारे त्यांनी शासनाला पारनेर-नगर मतदारसंघातील अडचणी, समस्या आणि विकासासाठी गरज असलेल्या कामांकडे लक्ष देण्याची मागणी केली.
त्यांनी ग्रामीण भागासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करत, शासनाला ठोस आणि सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.