चिंचोली मधील पिंपरकर मळा रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी जि.प. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून मिळाला निधी
पारनेर :- चिंचोली येथील पिंपरकर मळा येथील रस्त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या रस्त्यासाठी निधी देण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोलाचे योगदान असून, चिंचोली गावाचे माजी सरपंच सतीश पिंपरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
पिंपरकर मळ्यातील रस्त्याची स्थिती गेल्या काही वर्षांपासून अत्यंत खराब होती. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येच्या निवारणासाठी माजी सरपंच सतीश पिंपरकर यांनी वेळोवेळी डॉ. सुजय विखे पाटील आणि सुजित झावरे पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला, तर झावरे पाटील यांनी तांत्रिक बाबी पूर्ण करत प्रत्यक्ष भूमिपूजन करून कामाला सुरुवात करून दिली.
या प्रसंगी सतीश पिंपरकर यांनी दोन्ही नेत्यांचे मन:पूर्वक आभार मानत सांगितले की, “विखे पाटील आणि झावरे पाटील यांनी चिंचोली गावासाठी कायमच निधी मिळवून दिला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा वाटा आहे आणि भविष्यातही विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा आमचा विश्वास आहे.”
या भूमिपूजन कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे पिंपरकर मळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे आणि लवकरच या रस्त्याच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.