पारनेर :- कर्जुले हर्या गावात आज विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंधळे वस्ती ते कर्जुले हर्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावत शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे जंगी स्वागत केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दळणवळणाचा प्रश्न सुजित झावरे पाटील यांनी मार्गी लावला असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आंधळे वस्तीवरील नागरिकांना रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि नागरिकांचे हाल होत होते. काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष भूमिपूजन करत कामाला सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, “गावातील तरुण पिढी विकासाच्या प्रश्नांबाबत जागरूक झाली आहे, ही सकारात्मक बाब आहे. ग्रामस्थ आणि तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यास निश्चितच गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल.” यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कायमच प्रयत्नशील राहू असे आश्वासन यावेळी सुजित झावरे पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी गावातील तरुणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तरुणांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे कर्जुले हर्या गाव पुन्हा एकदा सुजित झावरे पाटील कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकेकाळी माजी आमदार स्वर्गीय वसंतराव दादा झावरे पाटील यांना एकदिलाने साथ देणारे हे गाव आता सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी सरसावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी आगामी काळात सुजित झावरे पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. त्यामुळे या कार्यक्रमाला केवळ भूमिपूजनाचे स्वरूप न राहता राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व प्राप्त झाले. उपस्थित सर्वांनीच भविष्यात विकासकामांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुजित झावरे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले.
सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर असताना कर्जुले हर्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याची आठवणही ग्रामस्थांनी यावेळी करून दिली. गावात दहा ते बारा बंधारे उभारण्यात आल्याने शेती ओलिताखाली येण्यास मोठी मदत झाली आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यास हातभार लागला. जलसंधारणाच्या कामांमुळे शेती उत्पादनात वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आज झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात सुजित झावरे पाटील यांनी गावातील व वाडी-वस्तीवरील विजेच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही सकारात्मक भूमिका घेत तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असून आगामी काळात या भागात भरीव विकासकामे करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला किसन धुमाळ, प्रसाद झावरे, रवी आंधळे, राहुल आंधळे, संतोष उंडे, रामदास दाते, रामा उंडे, संकेत वाफारे, मयूर आंधळे, सार्थक कोकाटे, सुनिल उंडे, नवनाथ आंधळे, कैलास उंडे, रामा कोकाटे, राहुल उंडे, ब्राम्हणणंद पाटील, विजय उंडे, प्रशांत वाफारे, दिलीप मोकाटे, संतोष रामदास उंडे, सिताराम उंडे, महिबूब पठाण, रोहन साळवे, बबन राधु उंडे, उत्तम आंधळे, मेजर रामदास उंडे, सावकार आंधळे, सुभाष आंधळे, गंगाराम उंडे, प्रज्योत शिर्के, वसंत आंधळे, संतोष शिर्के, दादू शिर्के, पंढरीनाथ उंडे, दिलीप उंडे, एकनाथ आंधळे, योगेश आंधळे, संग्राम उंडे, माऊली वाफारे, विकास हुलावले, सचिन कोकाटे, विजय काळे, गणपत वाफारे, सीताबाई उंडे, कल्याण उंडे, कल्पना आंधळे, मीराबाई आंधळे, वैशाली वाफारे, जनाबाई आंधळे, मनीषा आंधळे, जयश्री आंधळे, सुनीता आंधळे, मंगल चेमटे, वैशाली कानडे, समाबाई आंधळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जुले हर्या येथे झालेला हा विकासाचा शुभारंभ आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता आगामी काळात सुजित झावरे पाटील यांचे ग्रामीण भागातील राजकीय बळ अधिक मजबूत होण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सुजित झावरे पाटील यांना या भागातील वाढलेले पाठबळ नक्कीच राजकीय समीकरणे बदलविणार असल्याची चर्चा यावेळी होती.







